छत्रपती संभाजीनगर – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ ही आगामी मालिका आपल्या प्रेक्षकांसाठी सिनेमाच्या ग्लॅमरस पार्श्वभूमीवर बेतलेली एक भन्नाट प्रेमकहाणी घेऊन येत आहे. ही मालिका सुरू होत आहे 24 जून रोजी रात्री 8:00 वाजता. या मालिकेत एक अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार अयान ग्रोव्हर (अभिषेक बजाज) आणि एका छोट्या गावातील चित्रपटगृहाची मालकीण शिवांगी सावंत (खुशी दुबे) यांची कहाणी आहे. त्यांचे मार्ग त्यांना एकमेकांसमोर घेऊन येतात, ज्यातून एका अनपेक्षित प्रेमकहाणीची सुरुवात होऊ शकते!
मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात लक्षणीय कारकीर्द घडवणारा अष्टपैलू अभिनेता संजय नार्वेकर या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो ‘मुकेश जाधव’ ही नकारात्मक भूमिका करणार आहे. मुकेश जाधव एक धूर्त आणि निर्दयी ठेकेदार आहे, ज्याला शिवांगीला वडीलांकडून वारशात मिळालेला ‘संगम सिनेमा’ कसेही करून हस्तगत करायचा आहे.
या मालिकेत काम करत असल्याचा आनंद व्यक्त करताना संजय नार्वेकर म्हणाला, “मुकेश जाधव साकार करण्यात एक आव्हान आहे. त्याच्या व्यक्तिरेखेत अनेक कंगोरे आहेत, आणि ही व्यक्तिरेखा जिवंत करण्यास मी उत्सुक आहे. संगम सिनेमाचे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवांगीच्या मार्गातील तो सगळ्यात मोठा अडथळा आहे. एक अभिनेता म्हणून मला खलनायकी व्यक्तिरेखा करायला आवडतात, कारण मानवी स्वभावातील कठोर, कटू पैलूंचा शोध घेण्याची संधी त्यातून मिळते. तसेच त्यांच्या स्वभावातली गुंतागुंत आणि त्यांची व्यक्तिरेखा वेधक बनवणारा रांगडेपणा साकार करण्यास वाव मिळतो. ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ मालिकेत ही व्यक्तिरेखा जे नाट्य आणि रहस्यमयता घेऊन येते, त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे बघण्यास मी आतुर आहे. ही अशी भूमिका आहे जी एक अभिनेता म्हणून मला आव्हान देते आणि या भूमिकेत जीव ओतण्यासाठी मी तत्पर आहे!”
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ 24 जून पासून सुरू होत असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता ती प्रसारित करण्यात येईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!
