राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचं नाव डोळ्यासमोर येते ते आयएएस तुकाराम मुंढे, तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे. मात्र, तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळाला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी गतवर्षी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली (Transfer) झाली आहे. आता, विकास आयुक्त (असंघटित कामगार) (Labour) खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्याच्याही सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2005 मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली. विशेष म्हणजे 16 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 19 वेळा बदली झाली होती. आता, पुन्हा एकदा त्यांनी बदली करण्यात आली आहे. जून 2023 मध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याअगोदर अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. आता, आज पुन्हा त्यांनी बदली करण्यात आली आहे.
प्रशासकीय सेवा अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) सचिवपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने ते चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दुध उत्पादक संघाच्या मालकांनी मंत्रालयात येऊन त्यांचा सत्कार केला होता. दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले होते. आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली झाली आहे. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुनं मुंढे जी पावले उचलतात, तीच त्यांच्या बदल्ंयासाठी कारण ठरतात, अशी चर्चा नेहमीच असते. तुकाराम मुंढे यांची 18 वर्षाच्या सेवेत जवळपास 21 वेळा बदली झाली आहे. ते , 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत
सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष. दरम्यान, आयएएस अथवा आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी किमान दोन ते अडीच वर्षे सेवा बजावावी, पण तुकाराम मुंढे याला अपवाद ठरत आहेत. आता, ही एक वर्षातच त्यांची बदली झाली आहे.