स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण संदीप जगताप यांनी राजीनामा का दिला? असा सर्वांनाचं प्रश्न पडला असेल. याबाबत संदीप जगताप यांनी विविध गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.
संदीप जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रीय होते. अनेक ठिकाणी झालेल्या मोठमोठ्या आंदोलनात देखील जगताप यांचा सक्रिय सहभाग होता. विशेषत:नाशिक जिल्ह्यात संदीप जगताप यांनी विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आंदोलन केली. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर शेती प्रश्नावर अन्याय होईल, त्या त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन संदीप जगताप यांनी खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या बाजू लढवली होती.
खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारणी समोर मी राजीनामा ठेवला आहे. राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. वडिलांचे वय 72 झाले आहे. आई आजारी आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे. शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षापासून नवीन पुस्तक आलं नाही. लेखन बंद झालं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन मी हा निर्णय घेतला असल्याचे संदीप जगताप म्हणाले. कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे.
पुढील काही दिवसात राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा असल्याचे जगताप म्हणाले. माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील देखील आपण सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी माझ्यावरती लहान भावासारखे प्रेम केले. माझे मत व केलेली छोटी- मोठी आंदोलने आपण राज्यभर पोहोचवली. त्याबद्दल नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचे मी अंतकरणातून ऋण व्यक्त करतो असे संदीप जगताप यांनी म्हटलं.