तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिका (महत्त्वाची कागदपत्र असलेल्या फाईल्स) गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक फाईल्स गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्याची चौकशी करण्यासाठी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीने दिलेल्या या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
पुरातन नाणी आणि सोने चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारणारा दिलीप नाईकवाडी यांच्या संदर्भातील महत्वाची फाईल गायब झाल्या आहेत. मागील दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून ठेवल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थान नेमकं कोणाला पाठीशी घालतयं? भाविकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी केलाय.
तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच कोणत्या न कोणत्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असताना आता आणखी हा नवीन प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी सोने-चांदीचे मौल्यवान पुरातन दागिने गायब आणि त्यासोबतच दानपेटी घोटाळा उघडकीस आला होता. ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात सुरु असून मंदिर संस्थानचे तत्कालीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरती नेहमीच भ्रष्टाचार आरोप केले गेले. एवढेच नाही तर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर आणि मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्या संदर्भातील महत्त्वाची फाईल गायब असल्याचे यासमितीने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
जून 2013 मधील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे दस्तावेज, श्री तुळजाभवानी मंदिरातील गैर कारभाराची चौकशी संदर्भातील सप्टेंबर 2012 मधील फाईल तुळजापूर दानपेटी मोजणी संदर्भातील तहसील कार्यालयाची फाईल, मंदिरातील भरती प्रक्रियेतील महत्त्वाची दस्त गायब झाले आहेत. मे 2022 मध्ये संचिका गायब प्रकरणी 3 सदस्य समिती स्थापन करून याची चौकशी करण्यात आली होती. मागील दोन वर्ष हा अहवाल दडवून ठेवण्यात आला होता.
लेखाधिकारी यांच्यामार्फत चौकशी केल्यानंतर विविध विषयांच्या महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक पाईल्स गायब असल्याचा अहवाल देण्यात आला होता. दोषी लोकावर कारवाई करावी व याचा शोध लावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी दिला आहे. याबाबत आम्ही देखील मंदिर संस्थानची बाजू जाणून घेण्यासाठी मंदिर तहसीलदार व्यवस्थापक यांच्या शी संपर्क केला असता त्यांनी संपर्क टाळला आहे.