राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने गर्दी केली होती. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला. परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहचले आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17 हजार 471 पदांसाठी तरुण-तरुणी दमखम दाखवतील. काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह कायम दिसला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे.राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली.राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांकडून भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहर हद्दीत 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीत 32 जागांसाठी मैदानी चाचणी होत आहे. जवळपास 12 हजार मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पावसाचा व्यत्यय आल्यास राखीव दिवशी भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.